Pune News : पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, चोरी, दरोडे या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेचे मॉर्गेज लोन असल्याची माहिती लपवून ठेवून दुकान विकत देऊन ८४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अफसार अबरार अहमद अन्सारी (वय ३४, रा. सरखेज, अहमदाबाद, गुजरात) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune News
८४ लाख रुपयांची फसवणूक;
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोनी सोनाराम चौधरी (रा. हडपसर), सोनाराम रामुराम चौधरी, अॅड. रमेश खंडाळे आणि हवेली उपनिबंधक कार्यालय क्रमांक ९ मधील जबाबदार व्यक्ती अशा चौघांवर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत घडल्याची माहिती मिळत आहे.
हांडेवाडी रोडवरील यशराज सोसायटीमधील तळमजल्यावरील दुकान फिर्यादींनी खरेदी खताद्वारे सोनी चौधरी यांच्याकडून खरेदी केले होते. या गाळ्याच्या मालकीबाबत त्यांनी खोटी माहिती दिली. या गाळ्यावर इंडसंड बँकेच्या वानवडी शाखेतून मॉर्गेज लोन घेतले होते, ही माहिती त्यांनी लपवून ठेवली. गाळ्याची विक्री करताना गाळ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याची खोटी माहिती दिली. यामुळे फिर्यादीची तब्बल ८४ लाख रुपयांची फसवणूक झाली. Pune News
दरम्यान, याप्रकरणी आरोपी चौधरी याच्याबरोबर संगनमत करुन फिर्यादीपासून ही माहिती लपवून ठेवण्यात मदत केल्याबद्दल वकिल व हवेली क्रमांक ९ मधील जबाबजदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. Pune News