Pune News पुणे, ता. 30 : पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांनी धार्मिक प्रचार केल्याचा आरोप समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत ‘देश सोडण्याची’ नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून परदेशी नागरिकांच्या हालचालींवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, ५३, ६५ आणि ६६ वयोगटातील हे तिघे १९ ते २१ एप्रिल दरम्यान भारतात पर्यटन व्हिसावर दाखल झाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्य करत असताना त्यांनी धार्मिक प्रचार सुरू केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुरुवात एका खासगी कॅब चालकाच्या तक्रारीतून झाली. संबंधित नागरिकांनी त्याला बायबलसह इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पत्रके देत धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आर्थिक आमिषही दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. Pune News

तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता धार्मिक प्रचारासाठी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणात पत्रके जप्त करण्यात आली. चौकशीत परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) स्पष्ट केले की, संबंधित नागरिक पर्यटन व्हिसावर असूनही धार्मिक प्रचार करत होते. व्हिसाच्या अटींनुसार अशा प्रकारची कृती करण्यास मनाई असल्याने हा नियमभंग ठरतो. Pune News
दरम्यान, या पार्श्वभूमीवर इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टअंतर्गत कारवाई करत तिघांनाही ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनी याबाबत माहिती देत, व्हिसा नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर पुण्यात पर्यटन व्हिसावर येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हालचालींवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. Pune News







