Pune News : पुणे : स्वयंसेवी संस्था चालविणार्या महिलेसह दोघींचे अपहरण करुन, त्यांना बेदम मारहाण करुन, धमकी देवून, त्यांच्याकडून १७ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उत्तमनगरमधील देशमुखवाडी येथे समोर आला आहे. रेल्वे स्थानकात स्टॉल मिळवून देतो, असे सांगत १० लाख रुपये घेतले आणि पैसे परत न दिले नाहीत, या कारणामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांसह चौघांना अटक केली आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री ७ ते १४ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
उत्तमनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
याबाबत वैभव भास्कर पोखारे (वय ३२, रा. किरकटवाडी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५, रा. उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९, रा. एरंडवणा), प्रदिप प्रभाकर नलवडे (वय ३८, रा. भूगाव) (Pune News) आणि अक्षय मारुती फड (वय २४, रा. वारजे) अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत. मोहोळ आणि मोहिते हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई मिनाक्षी भास्कर पोखरे या जागृती सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. रेल्वे स्थानकात स्टॉल मिळवून देते, असे सांगून त्यांनी आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते. मात्र, पैसे परत न केल्याने आरोपींनी मिनाक्षी पोखरे व त्यांच्या सहकारी मनिषा पवार यांना उत्तमनगरमधील रुद्र हॉटेलजवळ बोलावून घेतले. (Pune News) मारहाण करुन, त्यांना गाडीत घालून अपहरण केले. मोहोळ याच्या घरी नेऊन डांबून ठेवून मारहाण केली. तेथून फिर्यादी यांना फोन करुन १७ लाख रुपये आणून दे, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणानंतर भयभीत झालेल्या फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपींचा शोध घेऊन दोघींची सुटका केली व चौघांना अटक करुन त्यांना उत्तमनगर पोलिसांच्या हवाली केले. (Pune News) या गुन्ह्यातील आरोपी बाबुलाल मोहोळ याच्यावर १० गुन्हे, अमर मोहिते याच्यावर ५ गुन्हे, प्रदीप नलवडे याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.