पुणे : शहरात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राइव्हची घटना समोर आली आहे. पुण्यातील (Pune News) बालगंधर्व रंगमंदिराजवळ एका मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक देऊन आपले वाहन थेट रस्त्यालगतच्या दुभाजकावर चढवले आहे. या घटनेत कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात तरुणाकडे वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) नसल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बालगंधर्व रंगमंदिरासमोर, विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. अनिकेत रमाकांत सोनटक्के (वय 25, रा. चाकण, मूळ-धाराशिव) असं कार कारचालकाचं नाव आहे. हा तरुण धाराशिवचा असून पुण्यात शिक्षणासाठी आला आहे.

अनिकेत हा शनिवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत होता. यावेळी त्याने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला, मात्र त्याने कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दुचाकीला धडक दिल्यानंतर अनिकेतने कार थेट छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दुभाजकावर चढवली. दुभाजकावर कार चढवल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर डेक्कन पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कारचालक अनिकेत याच्यावर ड्रिंक अँड ड्राइव्हचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून, परवाना नसतानाही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याबद्दल अनिकेतवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.







