Pune News : पुणे : पतीचा पगार घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेला, पतीच्या बॉसने शिवीगाळ करत, महिलेचा हात बळजबरीने पकडून तिला कार्यालयातून हाकलून दिले. एवढेच नव्हे तर अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून, तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय पीडित महिलेने कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असून, महिलेच्या फिर्यादीवरून गुर्जर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
कोथरूड येथील मयूर कॉलनीतील फ्युचर टेक कंपनीच्या आवारात सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती हा फ्युचर टेक कंपनीमध्ये काम करत होता. पीडित महिला व तिचा पती हे दोघेही त्याचा पगार घेण्यासाठी सोमवारी कंपनीत गेले होते. (Pune News ) त्यावेळी कंपनीचे संचालक अमेय गुर्जर यांनी महिलेशी आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी केली. पतीने तिला एकटीलाच पगार घेण्यासाठी पाठवायला हवे होते, अशी खालच्या दर्जाची टिपण्णी केली. या आक्षेपार्ह शब्दांमुळे त्याचा हेतू चुकीचा असल्याचे उघड झाले.
याचवेळी आरोपीने महिलेचा हात पकडून तिला कार्यालयातून बाहेर हाकलून दिले. या झटापटीत महिलेची बांगडी तुटली व हातालाही दुखापत झाली. (Pune News ) यानंतर संतप्त झालेल्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.
या घटनेचा अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.