Pune News : पुणे : हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथे पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील १७ पर्यटक पावसाच्या तडाख्यात सापडले होते. दोन दिवसांपासून त्यांचा संपर्क झाला नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व पर्यटकांशी संपर्क साधला असून, पुण्यातून हिमाचल प्रदेशात गेलेले सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.
नातेवाईकांचा जीव भांड्यात!
उत्तरेकडील राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु असून, पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाने घातलेल्या थैमानामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले होते. मात्र, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती दिली आहे.
हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी नागरिकांचे आवडते ठिकाण आहे. (Pune News) या ठिकाणी दरवर्षी हजारो नागरिक भेटी देत असतात. प्रामुख्याने कुलू, मनाली, कसोल, मंडी येथे सर्वाधिक पर्यटक भेटी देत असतात. या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे येथील अनेक नद्यांना पूर आला आहे. तर दरडी कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, ४ ते ९ जुलै दरम्यान चंदीगड ते हिमालच प्रदेशातील मनालीमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या १७ नागरिकांशी संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. (Pune News) सोमवार आणि मंगळवारपर्यंत यापैकी दहा नागरिकांशी संपर्क झाला होता. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. उर्वरित सात नागरिकांशी संपर्क होत नसताना बुधवारी दुपारपर्यंत इतर सर्व पर्यटकांसोबत संपर्क साधण्यात यश आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.
दरम्यान, यातील एक पर्यटक पंजाब या ठिकाणी पोहोचला असून, सर्वांना एकत्रित करून त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. नातेवाईकांनी काळजी करू नये, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असेही बनोटे यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; खडकवासला येथील घटना