Pune News : पुणे : सरकारी पद भरतीमध्ये कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपाची भरती करत असल्याची वस्तुस्थिती सांगितली. त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. राज्यातील तरुण – तरुणींसाठी आम्ही दीड लाख पदांची भरती करत आहोत असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील तरुण- तरुणींना दिला.
१ लाख ५० हजार तरुण – तरुणींची भरती
राज्याच्या वेगवेगळ्या खात्यात १ लाख ५० हजार तरुण – तरुणींची भरती केली जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र विरोधकांना उकळ्या फूटून सोशल मिडियावर काहीपण बातम्या पसरवत आहेत. असेही अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, गुरुवारी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत असताना अनेक ठिकाणी कर्मचारी कमी आहेत हे लक्षात आले. काही ठिकाणी तात्काळ कर्मचारी आवश्यक आहेत. विशेषतः शिक्षण विभागात आहे. नवीन शिक्षक भरती लगेच करता येत नाही म्हणून आम्ही निवृत्त झालेल्यां शिक्षकांना तात्पुरते घेतले आहे. तशा पध्दतीने इतर विभागात सहा महिने किंवा वर्ष लागत असते. लगेच भरती केली तर कोण कोर्टात जातात. अनुशेषाचा प्रश्न असतो, बिंदूनामावली सांभाळावी लागते.
यामध्ये कुठल्याही घटकांच्या शंका- कुशंका राहता कामा नये. त्यामुळे काही बाबतीत तातडीने लोकं भरती आवश्यक असतात. म्हणून ते घेण्याकरता त्या काळात निर्णय घेतला गेला. तो निर्णय मागच्या सरकारच्या काळातील आहे. त्या निर्णयावर कुणाकुणाच्या सह्या आहेत हे मी दाखवायला तयार आहे. असे सांगतानाच आज ते सरकारमध्ये नाही मग लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचे काम सुरू झाले आहे. आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू झाले आहे. मी ३०-३२ वर्षे महाराष्ट्रात काम करतोय.
तरुण – तरुणींचे काय प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत. ते दूर करण्यासाठी दीड लाख तरुण तरुणींची भरती करत आहे.
काही जागांवर विशेष म्हणजे डॉक्टरांची जागा रिकामी झाली तर तिथे डॉक्टर द्यावा लागतो. म्हणून काही ठिकाणी तात्पुरत्या जागा नियमित भरेपर्यंत त्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. कायमचा नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तीन राज्यातील विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जी – २० च्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील अनेक मान्यवर दिल्लीत आले होते. त्यानंतर लगेचच लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या कामाच्या व्याप वाढला असल्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला आहे. मात्र राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ संभाजीनगरमध्ये आहे. त्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील विकासाच्यादृष्टीने निर्णय घेतला जाणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.