Pune News | भोर, (पुणे) : स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, असे आपण नेहमीच म्हणत असतो. आजच्या धावत्या जगात आई-वडिलांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती आजूबाजूंना घडणाऱ्या घटनांमुळे वाटते. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असणाऱ्या नांदे गावातील दोन भावंडांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ घरासमोरच आईचे स्मारक उभे केले आहे.
फायबरपासून बनवला आईचा हुबेहूब पुतळा…
फायबरपासून बनवलेला आईचा हुबेहूब पुतळा घराच्या अंगणात स्थापन केला आहे. शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी हा पुतळा उभारून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचं कौतुक केले जात आहे. त्यांचं आई प्रति असलेलं प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत.
नील दत्तात्रय गोळे आणि मेकॅनिक असलेले संतोष दत्तात्रय गोळे हे दोघे भावंडं. त्यांची आई राहीबाई गोळे (वय ६२ वर्ष) यांचे करोना काळात निधन झाले होते. पुण्यातील बाणेर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु आईविषयी असणारे प्रेम, श्रद्धा, भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरासमोरच मंदिर उभारुन त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असणारे पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत ४५ वर्ष सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले. गावातील लोकांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं. त्यांच्याबाबत असलेलं प्रेम अनेकांनी बोलून दाखवलं त्यामुळे कुटुंबीयांनी थेट आईचं स्मारक उभारलं. राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनील, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे, प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांनी मिळून राहीबाई यांना अनोखी आदरांजली दिली आहे.
दरम्यान, आईचं अवतीभवती नसणं हे दोन्ही मुलांना मान्य होत नव्हतं. तिच्या आठवणीत नेमकं काय करु शकतो? याचा विचार करताना या स्मारकाची कल्पना सुचली आणि दोन्ही भावांनी मिळून आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा घरासमोच्या अंगणात स्थापन केला. त्यानंतर एप्रिलला या पुतळ्याचं गावकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण केलं. त्यांच्या या कृत्याचं सध्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे आणि आईच्या स्मारकाची चर्चादेखील होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : पुण्यात चक्क आंबे मिळतात हप्त्यावर ; कुठे ते वाचा
Pune : ज्येष्ठ शिक्षिका प्रतिमा काळे यांना “काव्य गौरव पुरस्कार” जाहीर