Pune New Mayor : पुणे महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन तृतीयांश बहुमतासह मिळवलेल्या या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे – पुण्याचा पुढील महापौर कोण होणार? (Pune New Mayor)

भाजपसाठी हा विजय केवळ आकड्यांचा नाही, तर राजकीय इतिहास बदलणारा ठरला आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून अनेक दशकांपर्यंत भाजपला विरोधी बाकांवरच बसावे लागले. २०१७ मध्ये प्रथमच पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवत ९७ जागा जिंकून सत्ता मिळवली आणि पुण्यातील सत्ताकेंद्राची दिशा बदलली. त्या वेळी पालिकेचा प्रशासकीय अनुभव असलेले नगरसेवक कमी असल्याने महत्त्वाची पदे मोजक्याच नेत्यांकडे केंद्रित झाली होती.
पहिल्याच टप्प्यात महापौरपदाची जबाबदारी मुक्ता टिळक यांच्याकडे सोपवण्यात आली. पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या आणि शांतपणे काम करणाऱ्या टिळक यांना महापौरपदाचा मान मिळाला, मात्र आजारपणामुळे त्यांचा कार्यकाळ अपेक्षेइतका सक्रिय राहू शकला नाही. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या काळातच करोना महामारीचा गंभीर टप्पा आला. या संकटाच्या काळात आरोग्य, सुविधा आणि समन्वय या आघाड्यांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आता पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या यशात मोलाचा वाटा उचललेल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांमध्ये या पदासाठी मोठी स्पर्धा आहे. मात्र, अंतिम निर्णय महापौरपदाच्या आरक्षणावर अवलंबून आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वेळा पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. यंदा आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने महिला, मागासवर्गीय किंवा अनुसूचित प्रवर्गातील उमेदवारालाही संधी मिळू शकते. आरक्षणाची सोडत जाहीर होण्यासाठी साधारण दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी महापौरपद हे केवळ मानाचे नव्हे, तर शहराच्या विकासदिशा ठरवणारे पद आहे. वाहतूक, पाणीपुरवठा, पर्यावरण, आयटी उद्योग आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा यासंबंधी निर्णयांवर पुढील महापौराची छाप असणार आहे. त्यामुळे “पुढील महापौर कोण?” हा प्रश्न राजकीयच नव्हे, तर प्रत्येक पुणेकरासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
यांना मिळेल संधी?
महापालिकेत आता कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चेला वेग लागला आहे. माजी सभागृह नेते आणि शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, वर्षा तापकीर, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, मंजूषा नागपुरे, अनिल टिंगरे, योगेश मुळीक अशा भाजपच्या अनेक वरिष्ठ नेते आणि बाळा ओसवाल, पृथ्वीराज सुतार, सचिन दोडकेसारखे इतर पक्षांतून आलेले नेते यांच्याकडे महापालिकेच्या कामकाजाची चांगली माहिती आहे.
म्हणून आता प्रश्न फक्त एवढाच उरतो की, या पैकी पुढच्या संधीची नळी कोणाकडे जाईल? चर्चा जोरात सुरु आहे आणि पुढच्या काही दिवसांत हाच विषय गाजत राहणार आहे.






