पुणे : पुण्यातील नवीन विमानतळ टर्मिनल लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याची पाहणी आज मी केली आहे, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. विमानतळाच्या नवीन टर्मिनलची पाहणी केली. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षाच्या काळात देशात ७४ विमानतळे उभारण्यात आले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात ७५ नवीन विमानतळ सुरू करण्यात आली आहेत. पंतप्रधान हे वेगाने विकास करण्यावर भर देत आहेत. देशाचे १७ शहरात सर्वाधिक विमान वाहतूक प्रवासी त्यात पुण्याचा समावेश आहे. ३६ शहरात पुणे शहरातून हवाई वाहतूक होते. त्यासोबत दुबई आणि सिंगापूरला येथून विमान सेवा आहे.
शिंदे पुढे म्हणाले, विमानतळ हे केवळ काच आणि सिमेंटचे नको तर विमानतळ हा एखादा शहराचा चेहरा आहे, त्या शहराची संस्कृती आणि परंपरा दिसून आली पाहिजे. महाराष्ट्र, पुण्याची संस्कृती विमानतळावर प्रवाशांना दाखविण्यात येईल. शनिवारवाड्याचे प्रतिकृती विमानतळास असून, दीपस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. छत्रपती शाहू महाराज आणि माझे पणजोबा यांनी पुण्यात प्रथम अश्वारूढ पुतळा बसवला, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.