संतोष गायकवाड
वाघोली: मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली येथे गुरुवार (दि.२६) पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्याबरोबर एका महिलेसह तिघांनी तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक भागतील मराठा समाजाने साखळी उपोषण सुरु करावे, असे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंतरवली सराटी येथे उपोषण सुरु आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सखल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. तसेच योगेश बर्डे, गणेश पवार, ज्योती सातव यांनी मंगळवार (दि. ३१) पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्याबरोबर उपोषण करत असलेल्या स्टेजवर येण्यास राजकीय पक्षांशी संबधित असलेल्या आजी, माजी नेते, पदाधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने सनदशीर व शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यात येत आहे. कोणीही भावना दुखावतील असे वक्तव्य करून नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करून नये, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.