पुणे: मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर या मार्गावर शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱ्यांसह अन्य प्रवाशांची कायम गर्दी असते. या मार्गावरील प्रवासी रेल्वे प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतात. हीच बाब ओळखत रेल्वे प्रशासनाने पुणे-नागपूर मार्गावरील प्रवास जलद करण्यासाठी वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाचा अभ्यास सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर-जोधपूर एक्स्प्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्स्प्रेस गाड्यांचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सद्यस्थितीत या मार्गावरील प्रवासी वेळ, प्रवासी क्षमता आणि वेळापत्रकाचा अभ्यास सुरू असून लवकरच ही ट्रेन जाहीर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नागपूरसाठी चौथी वंदे भारत मिळणार
- अडीच वर्षांपूर्वी नागपूर-जबलपूर-नागपूर ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर दुसरी वंदे भारत नागपूर-उज्जैन-इंदोर ही सुरू झाली.
- नंतर नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली.
- आता नागपूर-पुणे-नागपूर सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस ठरणार आहे.
प्रवाशांची उत्सुकता शिगेला
- नागपूर-पुणे मार्गावर दैनंदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. एरवी मेल एक्स्प्रेसने या मार्गावर १५ ते १६ तास लागतात. यामध्ये देखील सर्वाधिक गर्दीचा मार्ग असल्याने बऱ्याचदा रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यास मारामार होते.
- त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात यावी, अशी मागणी गेल्या अडीच वर्षांपासून जोर धरत आहे. अनेकदा याबाबतचे निवेदन मध्य रेल्वे, रेल्वे मंत्रालय, लोकप्रतिनिधी यांच्याकडे संघटनेद्वारे देण्यात आले आहे.
- अलीकडेच खुद्द मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांच्यात या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने प्रवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.