पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खडकी भागातील रेंज हिल परिसरात पोटच्या मुलानेच ५५ वर्षीय आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुंभाबाई शंकर पवार असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ज्ञानेश्वर शंकर पवार असं आरोपीचं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर पवार हा एका फॅक्टरी मध्ये काम करत आहे. तो त्याच्या आई सोबत खडकी भागात राहत होता. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने कधी विचारही केला नसेल. आज सकाळी त्याने आईच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून आईची हत्या केली.
कोणाला काही संशय येऊ नये म्हणून खोलीचे बाहेरून लॉक लावून त्याने तेथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी घराजवळ पाहिलं त्यावेळी गुंभाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.