पुणे : पुण्यातील अनेक भागांमध्ये सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. यासाठी झाडे तोडण्यात येत आहेत. बाणेर-औंध रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने जुनी दहा ते बारा वर्षांची झाडे तोडण्याचा उद्योग सुरु केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ही वृक्षतोड रोखावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौकामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. बाणेर रस्त्यावरही मेट्रोमुळे ट्रॅफिकच्या समस्या उद्भवत आहेत. यासाठी पुण्यातील बाणेर-औंध रस्त्यावरील दहा ते बारा वर्षांची जुनी झाडे तोडण्याचे कारस्थान महानगरपालिका करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. मनपा बेकायदेशीरपणे झाडे तोडत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
”रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली गणेशखिंड परिसरातील झाडे तोडण्यात आलेली आहेत. तसाच प्रकार बाणेर, औंधमध्ये सुरु आहे. ही झाडे आम्ही दहा ते बारा वर्षांपासून जपली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुऱ्हाड चालवू नये,” अशी प्रतिक्रिया शुक्रवारी सकाळी बाणेर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.