पुणे : पुणे शहर कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतं. अशातच आता शहरातील समाधान चौकामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महानगर पालिकेचा एक अख्खा ट्रक खड्डयात गेला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्रकाराने पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
हा प्रकार शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात घडला आहे. मैलापाणी वाहिनी दुरुस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक 25 फुट खड्ड्यात गेला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
नेमकं काय घडलं?
शहराच्या बेलबाग चौकाजवळच सिटी पोस्ट कार्यालय आहे. या परिसरात मैलापाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून संबंधित वाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास महापालिकेची मैलापाणी वाहिनी दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक व कामगार सिटी पोस्ट कार्यालयात आले.
View this post on Instagram
त्यांनी तेथील चेंबरमध्ये काम करण्यास सुरवात केली. नेमकं त्याचवेळी ट्रक थांबलेल्या ठिकाणची जमीन खचायला सुरुवात झाली. आणि काही वेळातच ट्रक खाली मोठा खड्डा पडून त्यामध्ये ट्रक जमीनीत खेचला गेला. ट्रकचा केबीनचा भाग वगळता संपूर्ण ट्रक जमीनीत गाडला गेला.
दरम्यान, चालकाने ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी खड्यात अडकलेला ट्रक काढण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुहास जाधव यांनी दिली आहे.