पुणे : पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. महापालिकेने उत्तम कामगिरी करून प्रथमच ५ स्टार होण्याचा मान मिळवला आहे. महापालिकेच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट आहे. आगामी काळात महापालिका ७ स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पुणे शहर हे आजपर्यंत ३ स्टारमध्ये होते. मात्र, आता महापालिकेने प्रयत्नपूर्वक हा मानाचा पुरस्कार मिळवल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ११ जानेवारीला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अशा २४ विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टींमध्ये महापालिकेच्या घनकचरा विभागाने चांगली प्रगती केली आहे.
केंद्र सरकारने ११ जानेवारीला राज्यातून फक्त ३ शहरांनाच निमंत्रण दिले आहे. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. पुणे महापालिकेचे याबाबत कौतुक होत आहे. “पुणे शहराला पहिल्यांदाच ५ स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात आपण ७ स्टारसाठी प्रयत्न करणार आहोत. ५ स्टारमध्ये देशातील ८-९ शहरे आहेत. त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे, असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी सांगितले.
मनपा आयुक्तांचे प्रशंसनीय नेतृत्व व विश्वास, अतिरिक्त आयुक्तांचे मार्गदर्शन, तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कठोर परिश्रम यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पुणे महापालिकेला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. आजी-माजी पदाधिकारी, पत्रकार आणि पुणेकर नागरिक यांचेदेखील यात मोलाचे योगदान आहे. मात्र, आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जोमाने काम करू, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.