पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात अनधिकृत पथारी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ख्रिस्तोफर जाॅन नाईक (२६, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात नाईकने अनधिकृत पथारी थाटली होती. मोबाइल संचाला काच बसवणे तसेच अन्य वस्तूंची तो विक्री करत होता. यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. यानंतर नाईक हडपसर क्षेत्रीय कार्यालयात गेला. तेथे महापालिका निरीक्षकाला कार्यालयात शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच फाइल फेकून दिल्या. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाईकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे करत आहेत.