पुणे : पुणे महापालिकेकडून हायड्रोजन निर्मितीबाबत प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन हायड्रोजनची निर्मिती केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार होणारा हायड्रोजन पीएमपी बसेससाठी इंधन म्हणून वापरला जाणार आहे. हायड्रोजन निर्मितीबाबत हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.
रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत देशातील पहिला हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प पुणे महापालिका, ‘वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘द ग्रीन बिलियन्स लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हा प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली आहे. शिवाय निरी, मुंबईच्या आयआयएमसारख्या संस्थांनी याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे. मात्र, हा प्रकल्प पुढे जाताना दिसत नव्हता.
केंद्र आणि राज्य सरकारने ग्रीन हायड्रोजन धोरण तयार केले आहे. त्यानुसार निधी मिळण्याबाबत महापालिकेने दोन्ही सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत अजून एक पाऊल पुढे जाण्यासाठी आणि आर्थिक बाबी तपासून पाहण्यासाठी महापालिकेच्या वतीने आर्थिक तांत्रिक विश्लेषण समितीची बैठक बोलावली होती. यात प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
हायड्रोजन पीएमपीसाठी दिला जाणार
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले की, रामटेकडी येथील प्रकल्पात तयार होणारा हायड्रोजन पीएमपीसाठी दिला जाणार आहे. त्याच्या वापराने इंधनाची किती बचत होते, खर्च कसा वाचेल? याची माहिती घेतली जाईल. याबाबत आम्ही पीएमपीला देखील प्रस्ताव सादर करणार आहोत.
महापालिकेवर कुठलाही आर्थिक बोजा येऊ देणार नाही
महापालिकेवर कुठलाही आर्थिक बोजा येऊ देणार नाही. पीएमपीला सीएनजीपेक्षा हायड्रोजन स्वस्त पडला तरच पुढे जाता येणार आहे. त्यामुळे महसूल मॉडेलबाबत आम्ही संबंधित कंपनीसोबत करार करणार आहोत, असेही यांनी सांगितले.
पहिला टप्पा असणार प्रायोगिक तत्त्वावर
पहिला टप्पा हा प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. त्यात ०.६ टन हायड्रोजन निर्माण केला जाणार आहे. त्यात यशस्वी झाल्यावर २०० टन आणि यानंतर ३५० टन हायड्रोजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आधी हा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याचेही खेमणार यांनी सांगितले.