पुणे: शहरातील पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीमाभिंत बांधण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून २०० कोटी रूपयांचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने अखेर पालिकेने हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठेकेदारांचे यासंदर्भातील पैसेही परत देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पुथ्वीराज बी.पी यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आमदारांवर नामुष्कीची वेळ आली आहे.
पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ ला ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला पूर आला. वस्त्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक सोसायट्यांच्या सीमा भिंती पडल्या. २० पेक्षा अधिक जणांचा यामध्ये बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने आंबील ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिती, नवीन पूल बांधले. पण काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे काम करता आले नाही. राज्य सरकारने या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मार्च महिन्यात मंजूर केला. राज्य सरकारने यानंतर ३० जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढत या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली. त्यासाठी शहरात कोणकोणत्या भागात सीमाभिंत बांधल्या जाणार आहेत, याचा स्पष्ट उल्लेख करून, त्यासमोर खर्चाची तरतूद केली होती. मात्र महानगरपालिकेच्या तिजोरीत यासंदर्भात एक रूपयाही जमा करण्यात आला नाही. त्यामुळे सहा महिन्यानंतर पालिकेने हे टेंडर रद्द केले आहे.
शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी या २०० कोटी रूपयांच्या निधीसाठी पालिकेला पत्र देऊन त्याबाबतचे वर्गीकरण सुचविले होते. त्यानुसार कामे सुचविण्यात आली होती. या २०० कोटी रूपयांच्या टेंडरवरून पुण्याच्या राजकारणात चर्चा झाली होती. माजी नगरसेवकांनी या सीमाभिंतीच्या टेंडरमध्ये आपली कामे सुचवली होती. पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा करण्यात न आल्याने आणि टेंडर प्रकिया सुरू होऊन सहा महिन्याचा काळ संपला असल्याने प्रक्रियेनुसार टेंडर रद्द झाले आहे.
लष्काराच्या हददीतील पाणी तुंबणारी ठिकाणे शोधणार
शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. अनेकदा लष्कारच्या भागातून शहरात पूराचे पाणी येत असते. लष्काराची परवानगी नसल्याने पुणे महानगरपालिकेला याठिकाणी काम करताना अडचणी येतात. त्यामुळे लष्काराच्या कोणत्या भागातून पावसाळ्यात पाणी येते याबाबत आज (गुरूवारी, दि. २४) लष्कारी अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात समन्वय ठेवून काम केले जाणार आहे.