पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच परिसर व नद्या स्वच्छ व्हाव्यात म्हणून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे. एकीकडे आपण पुणे शहराचा स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून गाजवाज्या करीत आहेत.
मात्र, याच शहरातील तब्बल १६ हजार नागरिकांना कचरा उघड्यावर टाकताना आढळून आले आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेने त्यांच्याकडून सुमारे ६६ लाख ३४ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहराचे एकूण क्षेत्रफळ 543 चौरस किलोमीटर इतके झाले आहे. पुणे शहरात रोज 2100 ते 2200 टन कचरा निर्माण होत आहे. तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते झाडणे, कचरा उचलणे यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत.
शहरात उघड्यावर कचरा टाकणारे सुमारे ९०० ठिकाणे होते. त्याठिकाणी उपाययोजना करून प्रशासनाने ही संख्या ६०० पर्यंत खाली आणली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यात थांबून नागरिकांना उघड्यावर कचरा टाकताना मज्जाव करत आहेत. तरी देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. महापालिकेकडून मनाई असताना देखील नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. यामुळे महापालिकेने आता कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत अनेक नागरिक उघड्यावरच कचरा टाकून घाण करत असतात. अशा नागरिकांवर महापालिकेची करडी नजर ठेवून होती. महानगर पालिकेने गेल्या साडेतीन महिन्यात १६ हजार नागरिकांवर कारवाई केली आहे. तरीही शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने हे कचरा टाकणारे सुधारण्याऐवजी शिरजोर होत असल्याचे चित्र आहे.