पुणे : राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पदांवरील अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी (ता.१५) बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली असून, आता त्यांच्या जागी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी डॉ. भोसले यांनी नगर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. भोसले यांनी नगर जिल्ह्यात महसूल विभागाचे डिजिटल उतारे देण्याचा निर्णय घेतला होता. भोसले यांच्या कार्यकाळात नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. भोसले यांचा सप्तपदी अभियानाचा उपक्रम राज्यभर गाजला.
दरम्यान, विक्रम कुमार हे २००४ च्या बँचचे अधिकारी आहेत. त्यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त पदावरून बदली करून एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले.