पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला असून द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्यात येणार आहे. सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी १०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तयार केला असून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.
याविषयी माहिती देताना एमएसआरडीसीच्या अधिकान्यांनी सांगितले की, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावत असतात. सध्या द्रुतगती महामार्ग हा सहापदरी असून महामार्गावरील वाहनांची दिवसेंदिवस वाढती वर्दळ लक्षात घेता सध्या हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’ने तयार केला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हा सुमारे ९४ किलोमीटर लांबीचा आहे. आता महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असून यांचे काम पूर्ण झाले आहे. तर आशिया खंडातील सर्वात मोठा ठरणाऱ्या दरी पूलाचे काम वेगाने सुरू आहे.
खालापूर ते खोपोली एक्झिटपर्यंत ८ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उसे टोलनाक्यापासून पुढे द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. या प्रकल्पासाठी थेट जमीन खरेदी करण्यात येणार असून नोबदल्यापोटी द्यावयाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल, अशी माहिती अधिका-यांकडून देण्यात आली आहे.