पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. देशात एनडीएचे सरकार स्थापन होत असून नरेंद्र मोदी आज (9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये राज्यातील 5 जणांना फोन आलेले आहेत. त्यामध्ये पुण्याच्या मुरलीधर मोहोळांसह रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची देखील केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी बाजी मारली आहे. 86369 मताधिक्यानं ते विजयी झाले आहे. 415543 मतं मिळवून त्यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना पराभूत केलं आहे. मुरलीधर मोहोळांना साधारण पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळालं आहे.
पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरी पर्यंत मुरलीधर मोहोळ हे आघाडी होते. मोहोळ हे विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा असून पुणेकरांनी विकासाच्या मुद्द्याला साथ दिल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत खालच्या पातळीवर टीका झाली पण पुणेकर नागरिकांनी विकासाच्या मुद्द्याला साथ दिली असल्याचे यावेळी मोहोळ म्हणाले.