पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने ४८५० सदनिकांसाठी काढलेल्या सोडतीला दीर्घ कालावधीनंतर निकालाला मुहूर्त लागला आहे. येत्या गुरुवारी (१८ जुलै) सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑनलाईन सोडतीचा निकाल लागणार आहे. या सोडतीसाठी ४६ हजार ८२४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला असल्याची माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. म्हाडा आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत १३७२ सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेंतर्गत १८ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १०३७ आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्यअंतर्गत २४२३ सदनिकांचा समावेश आहे. पत्रकार, नाट्य कलाकार, स्वातंत्र्यसैनिकांसह विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी), अनुसूचित जमाती (एसटी), अनुसूचित जाती या आरक्षणाशिवायच्या अर्जाची पात्रता तपासणी झाली आहे. आरक्षणातून अर्ज सादर केलेल्या अर्जदारांची पात्रता तपासणीसाठी एक महिन्याचा कालावधी असणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.