पुणे : प्रत्येकाचं स्वत:च घर असावं असं स्वप्न असतं, आता तेच स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने आता मुंबईनंतर पुणे विभागात घरांची सोडत करण्याचे जाहीर केले आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे , पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ आज गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर 2024)रोजी दुपारी 12 वा. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आज ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.
तसेच ऑनलाईन संगणकीय सोडत 5 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार 10 ऑक्टोंबर रोजी 12 वाजल्यापासून ऑनलाईन पेमेंट देखील करु शकतील. तसेच 12 नोव्हेंबर रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदार ऑनलाईन अनामत रक्कमेचा भरणा करु शकणार आहे.
पुणे म्हाडा सोडतीसाठी 13 नोव्हेंबर,2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिमतः 30 नोव्हेंबर रोजी सोडतीतसहभाग घेणार्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
याबरोबरच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणा-यास या योजनेअंतर्गत 2340 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 418 सदनिका प्रथम येणा-यास प्राधान्य तत्तावर नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3312 सदनिकांचा समावेश आहे.तसेच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 131 सदनिकांचा यात समावेश आहे.
दरम्यान, सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये असे आवाहन म्हाडाने केली आहे.