पुणे : पुण्यात घर घेण्यासाठी इच्छुकांना आणखी एक संधी मिळाली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 10 ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 12 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता इच्छुकांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने जाहीर केलेल्या सोडतीसाठी आत्तापर्यंत सुमारे तीस हजार अर्ज दाखल झाले आहेत. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 10 डिसेंबर असणार आहे. 10 डिसेंबर रोजी पाच वाजेपर्यंतची ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज सादर करण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत तर ऑनलाइन पेमेंट स्वीकृतीसाठी 12 डिसेंबर रोजी बारा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बॅंकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 13 डिसेंबर अशी मुदत देण्यात आली असून 7 जानेवारी 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती साकोरे यांनी दिली आहे.