पुणे : पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. वारंवार होणा-या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर वैतागून जातात. सध्या शहरातील सुरु असलेल्या मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता पुण्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन नव्या मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे चौफेर वाढून भक्कम होणार आहे.
राज्य सरकारने या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी 9 हजार 897 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या मेट्रो मार्गाची लांबी 31.63 किमी असणार असून यामध्ये 28 स्थानकांची उभारणी होणार आहे. खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक असणार असून पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे.
तर दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबागेला जाणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाला आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल आहेत.