पुणे (Pune): पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजार अशी आहे. तर पुणे मेट्रोचा एक लाख मेट्रो कार्ड वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा एकच्या विस्तारीकरणाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गिकेचे काम प्रगती पथावर आहे, तर स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे.
पुणे मेट्रोने प्रवाश्यांना तिकीट काढण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये तिकीट वेन्डिंग मशीन, व्हाट्स अँप तिकीट, किऑस्क द्वारे तिकीट, मेट्रो कार्ड आणि तिकीट खिडकी समावेश आहे. यांमधील सर्वात सोपी, आरामदायक व आधुनिक पद्धत म्हणजे पुणे मेट्रो कार्ड पध्दत होय. १२ ऑगस्ट २०२३ रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘एक पुणे मेट्रो कार्ड’ चे लोकार्पण करण्यात आले.
सोमवार (दि. २१) पुणे मेट्रोने १ लाख मेट्रो कार्डच्या विक्रीचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. यामधून प्रवाश्यांची पुणे मेट्रोला पसंती आणि विश्वास प्रदर्शित होतो. या १ लाख कार्डमध्ये एक पुणे कार्ड ५८,२७७, विद्यार्थी पास कार्ड २३,३७८ आणि नॉन-केवायसी कार्ड १८,३८९ अशी विक्री झालेली आहे. पुणे मेट्रोच्या एकूण उत्पन्नामधील ८० % उत्पन्न हे ‘डिजिटल पेमेंट’ च्या माध्यमातून येत आहे. भारतातील सर्व मेट्रोमध्ये पुणे मेट्रो डिजिटल पेमेंटमध्ये सर्वात अग्रेसर आहे.