पुणे: दिवाळी सणाच्या (Pune Metro) पार्श्वभूमीवर (Pune News) पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त मंगळवारी (21 ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजल्यानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच दोन्ही मार्गिकांवर स्वारगेट ते पिंपरी चिंचवड (पर्पल लाईन) आणि वनाज ते रामवाडी (एक्वा लाईन) मेट्रो सेवा कार्यरत राहील. हा निर्णय सुरक्षा आणि प्रवासी मागणीतील घट लक्षात घेऊन पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) तर्फे घेण्यात आला आहे. बुधवारी (22 ऑक्टोबर) पासून मात्र नियमित वेळापत्रकानुसार रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहील.

दिवाळीच्या काळात शाळा, महाविद्यालये तसेच खासगी आणि शासकीय कार्यालयांना सुट्या असल्याने शहरातील वाहतूक आणि सार्वजनिक प्रवास कमी होतो. अनेक नागरिक मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जात असल्याने या काळात मेट्रो प्रवाशांची संख्या घटते. मागील वर्षीच्या दिवाळीमध्येही प्रवासी संख्येत तब्बल 1 ते सव्वा लाखांची घट नोंदली गेली होती.
सध्या पुणे मेट्रो रोज सरासरी दोन लाख प्रवाशांना सेवा पुरवते. एकूण 34 गाड्या दररोज धावतात आणि सकाळी सहा ते रात्री 11 वाजेपर्यंत मिळून सुमारे 554 फेऱ्या घेतल्या जातात. मात्र, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ 12 तासांची सेवा असल्याने अंदाजे 350 ते 400 फेऱ्या म्हणजेच 30 ते 40 टक्के सेवा कमी होणार आहे.

महामेट्रोकडून प्रवाशांना सुरक्षिततेसंबंधीही सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या काळात फटाके आणि इतर ज्वलनशील वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. मेट्रोमध्ये अशा वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करावे, तसेच तपासणीदरम्यान ज्वलनशील वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई होईल, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी मेट्रो प्रवासासाठी प्रवासी गर्दी कमी असते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सहानंतर सेवा बंद राहील, तर बुधवारी नियमित वेळापत्रकानुसार मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत धावेल,” असे महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (जनसंपर्क व प्रशासन) चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.







