पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पुण्यात शिवीगाळ करत दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कोयता डोक्यात मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार येरवडा भारतगनर येथे घडला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. शहरात भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमके काय घडले?
याप्रकरणी राज नारायण सदभैया (वय, 23 रा. भैरवनाथ मंदिर जवळ कतारवाडी, येरवडा, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून यश ओव्हाळ (वय 19 , रा. भारतनगर येरवडा) आणि हितेश सोनवाल (वय 20 आरोग्य भवन जवळ येरवडा, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राज सदभैया हे त्यांच्या भाऊ शिवाला शोधण्यासाठी मैदानावर गेले होते. त्याच मैदाणावर आरोपी यश आणि हितेश होते. तेथे आरोपी यश आणि हितेश यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर वाद विकोपाला पोहोचला. त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी धारदार शस्त्राने मारहाण केल्याचेदेखील तक्रारीत म्हटले आहे.
पुण्यात रोज नवे भाई अन् टोळ्या
पुण्यात मागील सहा महिन्यांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धुमाकूळ कमी करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहेत. मात्र सध्या बघायला गेले तर पुण्यात रोज नवी एक टोळी तयार होताना दिसत आहे. रोज नवा भाई तयार होताना दिसत आहे. भररस्त्यात मारहाण करणे, गाड्या फोडून दहशत निर्माण करणे, एकमेकांवर क्षृल्लक कारणावरुन हल्ले करणे हे प्रकार सुरुच आहेत. भाईगिरीच्या नावाने पुण्यात अनेक परिसरात धुमाकूळ माजवला जात असल्याचं घडत असलेल्या घटनांमधून दिसत आहे.