पुणे : पुणे-लखनऊ ६ ए ०३३८ हे विमान ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण होणार होते. मात्र, ते रद्द करून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी म्हणजेच १२ एप्रिल रोजी उड्डाण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व प्रवाशी पुणे विमानतळावर रात्री १० वाजण्याच्या दरम्यान आले असता सुरुवातीला फ्लाईट २ तास उशिराने उड्डाण करेल असा मेसेज आला. त्यानंतर आणखी तीन तास, चार तास असे मेसेज आले. पुन्हा सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल, असे जाहीर करण्यात आले. मात्र, तब्बल १८ तास या विमानाला उड्डाण करण्यास लागल्याने प्रवाशी प्रचंड वैतागले असून, ग्राहक आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
पुणे-लखनऊ विमानाने पुण्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे काही कार्यकर्ते लखनऊ येथे बैठकीसाठी जाणार होते. यामध्ये सूर्यकांत पाठक, विजय सागर, धनंजय गायकवाड, वीणा दीक्षित आदी जणांचा समावेश आहे. पुणे-लखनऊ विमानाला उशिर झाल्याने सर्व प्रवाशी प्रचंड चिडले होते. या विमान प्रवासात दोन प्रवाशांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले होते. तर एक प्रवासी हा त्याच्या २२ वर्षांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यांना लखनऊवरुन पुढे गोरखपूरला जायचे होते. तर काही प्रवाशांना पुढील कनेक्टिंग विमान पकडून जायचे होते. यात काही ज्येष्ठ प्रवाशी, काही गरोदर महिला देखील होत्या. या सर्व प्रवाशांना खूप त्रास झाला आहे. याबाद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय सागर यांनी आम्ही ग्राहक न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले