पुणे : पुण्यात लोकसभेच्या आखाड्यात दोन पैलवानांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ असे दोघेही तगडे उमेदवार आहेत. दोघांच्याही प्रचाराला जोरदार सुरवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचारादरम्यान पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर दोघेही एकत्र आले होते. त्यावेळी रवींद्र धंगेकरांना एक प्रश्न विचारण्यात आला. मुरलीधर मोहोळ तुम्हाला आवडतात का?, असा प्रश्न विचारल्यानंतर धंगेकरांनी क्षणाचाही विचार न करता एका वाक्यात उत्तर दिले. धंगेकर म्हणाले की, मला फक्त पुणेकर आवडतात… या उत्तरामुळे अनेकजण अवाक झाले.
वाडेश्वर कट्ट्यावर झालेल्या गप्पांदरम्यान धंगेकरांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर धंगेकरांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिले. मुरलीधर मोहोळांबाबत बोलताना ते म्हणाले की, मी आजवर मोहोळांच्या संपर्कात फार आलो नाही. महापालिकेत महापौर असतानाही मोहोळांसोबत काम केले नाही. मला मुरलीधर मोहोळांची एकही गोष्ट आवडत नाही आणि कधीही आवडली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वसंत मोरे आणि मी एकत्र काम केले आहे. शिवाय आम्ही भाऊ-भाऊ आहोत. ते एकेकाळी माझे सहकारीदेखील होते, असे सांगत धंगेकर यांनी मोरेंविषयीच्या आठवणी सांगितल्या.
धंगेकर म्हणाले की, ५० वर्षांत २० वर्षे भाजपने सत्ता केली आहे. देशाची रचना एका दिवसांत तयार झालेले नाही. या रचनेसाठी मोठा काळ लोटला गेला आहे. हे सगळे लपवण्याचे काम विरोधकांकडून सुरु असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.