पिंपरी : कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांवरील रागातून वाहनचालकाने बसला आग लावली. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली. दरम्यान यामध्ये आरोपी बसचालक जखमी झाला होता. त्याला गुरुवारी (दि.२७) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जनार्दन निळकंठ हंबर्डीकर (वय ५६, रा. वारजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जनार्दन हा हिंजवडी फेज दोन येथील व्योम ग्राफिक्स या कंपनीत चालक म्हणून काम करत होता. १९ मार्च रोजी सकाळी तो कंपनीतील १२ कर्मचाऱ्यांना घेऊन कंपनीत येत होता. त्याने अगोदरच कंपनीतून वेन्झीन नावाचे केमिकल गाडीत ठेवले होते. वारजे येथून त्याने सकाळी काडीपेटी खरेदी केली होती. कंपनीपासून काही अंतरावर आल्यानंतर त्याने बेन्झीन केमिकलच्या साहाय्याने बसमध्ये आग लावली. या घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. चालक जनार्दन हा देखील जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान तो मेडिकल कस्टडीमध्ये उपचार घेत होता. त्याला गुरुवारी डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली.
त्यानंतर न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (दि.२९) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जनार्दन याने कंपनीने त्याचा पगार थकवला, त्याला बोनस दिला नसल्याचे आरोप केले होते. कंपनीवर केलेले आरोप कंपनी मालकाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.