पुणे : कडाक्याच्या थंडीनंतर पुण्यात अचानक उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानाच्या पाऱ्याने बुधवारी ३५.५ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. पुणे हे बुधवारी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३७.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्या खालोखाल सांगलीत ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर आणि लोहगाव येथे कमाल तापमान नोंदले गेले. सरासरीपेक्षा ४.१ अंश सेल्सिअसने हा पारा वाढला होता. शिवाजीनगर येथील किमान तापमान १६.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर लोहगाव येथे १७.९ किमान तापमान नोंदले गेले.
पुणे शहर आणि परिसरात शनिवारपासून (ता. १०) आकाश काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी होईल. कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, अशी शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली. तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तराखंड, राजस्थानमध्ये किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. पूर्व विदर्भापासून तेलंगण, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
दरम्यान, एकीकडे तापमानात वाढ होत असतानाच विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. ९) ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.