पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांशी या प्रकरणी फोनवरून चर्चा केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याचीच दखल घेत गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.
ज्यांनी अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रात्री-अपरात्री, उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि धनाढ्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला आहे. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर झाला असला तरी देखील त्याविरोधात अपील दाखल करा. या आरोपीला कोणती विशेष ट्रीटमेंट दिली असल्यास त्यावेळी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असतील तर, तात्काळ संबधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन दिले आहेत.