पुणे : राज्यभरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने वरच्या धरणातूनही पाणी सोडणे सुरू झाले आहे.
पुणे जिल्ह्यात होणारा जोरदार पाऊस हा सोलापूर जिल्ह्यासाठी उत्तम मानला जातो. कारण पुणे जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत असतो. सध्या पुण्यात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे, उजनीत सकाळपासून 47000 क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे. थोड्या वेळात हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तसेच पारगावमध्ये देखील 68000 क्युसेक विसर्गने पाणी येत आहे.
पुण्यात जोरदार होणा-या पावसामुळे उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढला, त्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. धरणात 53 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणात वजा 14 टक्के एवढे पाणी आहे. सध्याची स्थिती पाहता उद्या सायंकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.