पुणे : वादग्रस्त ट्रेनी ias अधिकारी पूजा खेडकर ह्या सद्या त्यांच्या कारनाम्यांमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. पूजा खेडकरने स्वतःच्या आलिशान गाडीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पूजा खेडकर या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. कार प्रकरणी पुणे पोलिसांची नोटीस मिळताच त्यांनी त्यांच्या बाणेर येथील बंगल्यातून आलिशान कार गायब केली आहे. या सोबतच बंगल्यात असलेली दुसरी आलिशान गाडीही खेडकर यांनी हलवली असल्याचे समोर आले आहे.
ऑडी कारवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या. ही बाब समोर येताच बाणेर येथील बंगल्यात गुरुवारी ही आलिशान गाडी झाकून ठेवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी (दि. १२) ही गाडी बंगल्यातून हलवण्यात आली आहे. याच गाडीवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या. त्याखेरीज बंगल्यात असलेली दुसरी मोटारही खेडकर यांनी बंगल्यातून हलवली असल्याचे समजते.
अंबर दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असताना सुद्धा पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी आलिशान गाडीवर दिवा लावला होता. परिविक्षाधीन अधिकारी असताना स्वतःच्या मोटारीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पूजा खेडकर या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे त्यांची आलिशान गाडीही चर्चेत आली. पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या मोटारीवर कारवाई करण्यास गेले होते. मात्र, त्यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी करत बंगल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच उभे केले. त्यानंतर शुक्रवारी ही मोटार बंगल्यातून गायब करण्यात आली आहे.
पूजा खेडकर वापरत असलेली ही मोटार थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीचे मूळ मालक हे पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. मोटारीच्या मूळ मालकाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस त्यांना नोटीस बजावण्याची शक्यता आहे.
आलिशान गाडीवर होणार कारवाई
पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे अंबर दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. खेडकर यांनी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटीदेखील लावली होती. या प्रकरणी कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंडसुद्धा आहे. पूजा खेडकर यांच्यावर कारवाईचे स्वरूप काय असेल, त्यांना आर्थिक दंड होणार की गुन्हा दाखल होणार, याबाबतचे चित्र लवकरच पोलिसांकडून स्पष्ट केले जाणार आहे.