मिरज : पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनकडून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील विवाहित तरुणी नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला निघाली होती. मात्र तिला रेल्वेत झोप लागल्याने ती मिरजेत पोहोचली. यावेळी मिरज रेल्वेस्थानकाबाहेर मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी सिंग आणि त्याच्या चार साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला कर्नाटकात जमखंडी येथे नेऊन ४ लाख रुपयांना विक्री करून तिचे लग्न लावून दिले. सामूहिक अत्याचाराची तिने माहिती दिल्यानंतर तिच्यासोबत लग्न केलेल्या संबंधिताने पीडितेला पुन्हा मिरजेत आणून सोडून लग्नासाठी दिलेले ४ लाख रुपये परत घेतले.
याप्रकरणी पीडितेने पुण्यात जाऊन फिर्याद दिल्यानंतर ती मिरज पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. मिरजेत गांधी चौक पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह ११ जणांना अटक केली असून, ते सर्व जण तुरुंगात आहेत. पोलिस तपासात पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत.
महम्मदहुसेन महम्मदगौस शेख (वय ३१), अबुजर फारुख जमादार (वय १८), महंम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला (वय २०), खालीद मुबारक कोरबू (वय २०), जुबेर ऊर्फ कपाला शब्बीर शेख (वय २४), महम्मदगौस ऊर्फ सरफू शेरखान फकीर (वय २२), संतोषी बाबू नाशिककर (लग्नानंतरचे नाव इरम महम्मदगौस फकीर, वय २६) (सर्व रा. ख्वॉजा वस्ती मिरज) त्यांच्यासह गंगा आणि मुक्ता नामक दोन महिला, अण्णा नामक एक व्यक्ती आणि कर्नाटकात लग्न लावून दिलेला ब्रातेश (रा. जमखंडी) अशी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींची नावे आहेत.