पुणे: केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात निर्णय बुधवार, २३ एप्रिल रोजी घेतला. एफटीआयआयला विशिष्ट श्रेणीमध्ये हा दर्जा देण्यात आला. काही महिन्यांपूर्वी माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एफटीआयआयला अभिमत दर्जा देण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती.
एफटीआयआय ही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली संस्था आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित संस्था आहे. २०१४ मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश’ जावडेकर यांनी एफटीआयआयला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्याची घोषणा केली.
अलीकडेच संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासंदर्भातील कार्यवाही, सुरू करण्यात आली होती, तसेच काही महिन्यांपूर्वी विद्यमान माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एफटीआयआयला दिलेल्या भेटीदरम्यान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली होती.
या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाने एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. एफटीआयआयचा प्रस्ताव विचारात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जुलै २०२४ मध्ये तज्ज्ञ समिती नियुक्त केली. त्यानंतर यूजीसीच्या सल्ल्यानुसार शिक्षण मंत्रालयाकडून एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता तीन वर्षांत करण्याच्या अधीन राहून इरादापत्र दिले. त्यानुसार एफटीआयआयच्या संचालकांनी १७ जानेवारी २०२५ रोजी पूर्ततेसंदर्भातील अहवाल यूजीसीला सादर केला. यूजीसीने तो प्रस्ताव तज्ञ समितीसमोर ठेवला.
तज्ञ समितीच्या शिफारशी यूजीसीच्या १३ मार्च २०२५ रोजी झालेल्या ५८८व्या बैठकीत मान्य करण्यात आल्या, त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने बुधवारी एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल केल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले.