Pune Fraud News | पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिासांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट खासगी वित्तीय संस्थेच्या संचालकांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुमारे २०० लोकांना अंदाजे ३०० कोटी रुपयांचा गंडा…
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे कर्ज थकल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना कर्ज टॉपअप करुन देतो, असे सांगून त्यांना एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेण्यास लावले. ते पैसे आपल्या कंपनीत गुंतविण्यास लावले. त्यानंतर सुमारे २०० लोकांना अंदाजे ३०० कोटी रुपयांचा गंडा घालून कंपनी संचालक ऑफीस बंद करुन पळून गेला आहे.
या प्रकरणी सेल्वाकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेट नावाने खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय लष्कर भागातील न्यूक्लिअस मॉल परिसरात सुरू केले होते. नडार आणि साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. आरोपी नडार आणि खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योजना मांडल्या होत्या. काही जणांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले होते. कर्ज मंजूरी प्रक्रियेसाठी नडार याने पैसे उकळले होते.