पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई पुजा वाडेकर यांना निलंबित करण्यात आले आहेत. विनापरवाना कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने वाडेकर यांचे निलंबन करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम यांनी शुक्रवारी (दि.16) रोजी हा आदेश काढला.
महिला पोलीस शिपाई पुजा वाडेकर या ऑगस्ट 2022 पासून वरिष्ठांची परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर होत्या. दीड वर्षाच्या कालावधीत त्यांना वारंवार नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच व्हॉट्सअॅप वर देखील नोटीस पाठवून कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी नोटीस पाहून त्याला प्रतिसाद दिला नाही. पूजा वाडेकर या वरिष्ठांच्या पुर्वपरवानगी शिवाय कर्तव्यावर गैरहजर राहुन कर्तव्यात बेजबाबदार व बेशिस्त वर्तन केल्याचे आदेशात नमूद करुन शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
निलंबन कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर सोडून जायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय यांची पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय येथे हजेरी देणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. तसेच निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी किंवा धंदा करुन अर्थाजन करत नसल्याचे प्रमाणपत्र देवून निर्वाह निधी घ्यावा असे ही आदेशात नमूद केले आहे.