पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर मदत करण्यासाठी एका तरुणीचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. मुख्य आरोपी संदिप धुनिया याच्या प्रेयसीसह आणखी एक तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड संदिप धुनिया याची प्रेयसी सोनम पंडित हिला पोलिसांना ताब्यात घेतलं असून सोनमकडे याप्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. या रॅकेटमध्ये सोनमचा देखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
सोनम आणि तिच्या मैत्रिणीच्या मदतीने ड्रग्स रॅकेटचे आर्थिक व्यवहार केले जात होते. संदीप धुनिया याच्याकडे असलेले पैसे या दोघी हवालामार्फत पाठवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. शहरात मेफेड्रोनचा साठा आढळून आल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. यामध्ये मेफेड्रोनचे उत्पादन करणाऱ्या कुरकुंभ येथील कारखान्यासह दिल्ली आणि सांगलीत छापे टाकण्यात आले.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करून सोडेतीन हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १८०० किलो एमडी जप्त केले आहे. एमडी तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालामार्फत झाल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अकरा आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड संदीप धुनिया अजूनही फरार आहे. संदीप धुनिया नेपाळमधील काठमांडूमार्गे कुवेतमध्ये पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.