पुणे : पुण्यातील बाणेर येथील एका डॉक्टरची १ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परदेशातून आलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून पोलिसी कारवाईची भिती दाखवून एका डॉक्टराची १ कोटी १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार १ ते ७ मार्च दरम्यान घडला आहे. याबाबत एका ५० वर्षाच्या डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाणेर येथील एका डॉक्टरांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून तुमच्या नावाने मुंबई ते तैवान पाठविण्यात आलेले पार्सल परत आले आहे. त्यामध्ये पाच पासपोर्ट, परदेशी चलन, लॅपटॉप, अमली पदार्थ सापडले असून मुंबई विमानतळावर पाकीट जप्त करण्यात आले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर केला आहे. असं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
चोरट्यांनी त्यांच्या साेशल मीडियातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, असं सांगितलं, तसेच त्यांच्यावर मनी लॉन्डिंग, डग्ज ट्रॉफिकिंगची केस होऊ शकते, अशी भिती देखील चोरट्यांनी डॉक्टरला दाखविली.
तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची आहे, त्यामुळे तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागणार असल्याच चोरट्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी आपली सर्व रक्कम १ कोटी १ लाख ३० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.