जेजुरी : राज्यातील मानाच्या १० पालखी सोहळ्यांपैकी सहा पालखी सोहळ्यांतील ३४४ दिड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे ६८ लाख ८० हजार रुपये अनुदान देण्यास पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी दिली.
आषाढी एकादशीपूर्वी राज्यातील मानाच्या १० पालखी सोहळ्यांतील सुमारे १५०० दिंड्यांना वारकरी दिंडी सन्मान निधी योजनेची २० हजार रुपये रक्कम थेट लाभधारक दिंडी किंवा दिंडीचालक यांच्या नावावर जावी, याबाबत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले होते. पालखी सोहळ्याबरोबर चालणाऱ्या असंख्य दिंड्या या परंपरेने चालत असल्यामुळे त्या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने जरी अनुदान जाहीर केले असले तरी कागदपत्रांची पूर्तता त्यांना करणे शक्य नसल्याने या दिंड्यांना शासनाच्या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे अशक्य होते. त्यामुळे हे अनुदान दिंडीचालकाच्या नावावर मिळावे, अशी मागणी दिंडीचालकांनी केली होती. श्री. त्यानुसार मानाच्या दहा पालख्यांतील सुमारे १५०० दिंड्यांच्या नावावर किंवा नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांच्या चालकांच्या नावावर अनुदानाची २०,००० रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे.
राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी या सहा अधिकृत मानाच्या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे ३४४ दिंड्यांतील सुमारे तीन लाख वारकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला असल्याचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
दिंडीचे खाते असल्यास खात्यावर किंवा दिंडीप्रमुखाच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येईल, असे सांगून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव व संत निळोबाराय या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या दिंडी प्रमुखाचे खाते क्रमांक, बँक नाव, बँक शाखा व आयएफएससी कोड ही माहिती उपलब्ध होताच अनुदानाची रक्कम दिंडीच्या किंवा दिंडी चालकाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे ते म्हणाले.