पुणे : पुणे विभागातील रेल्वे गाड्या आता सुसाट धावणार आहेत. रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्याची मागील काही दिवसांपासून होत होती. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा कमाल वेग आता ताशी १०० वरून ११० किलोमीटर करण्यात आला आहे.
पुणे विभागात रेल्वे गाड्यांच्या कमाल वेगात वाढ करण्यात आली आहे. त्यात पुणे ते साताऱ्यादरम्यान रेल्वेचा वेग ताशी ११० किलोमीटर झाला आहे. तसेच सातारा ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर या दरम्यानही वेग ताशी ११० किलोमीटरवर पोहोचला आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी तपासून आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण तांत्रिक तपासणी केल्यानंतरच रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आली आहे. गाड्यांचा वेग वाढल्याने त्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यात मदत होणार आहे. याचबरोबर प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेकडून गाड्यांचा वेग वाढविण्याच्या दिशेने मागील काही वर्षांपासून पावले उचलली जात होती. प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी आणि त्यांना उत्तम सेवा द्यावी यासाठी मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यात रेल्वे गाड्यांचा वेग वाढवणे, पायाभूत सुविधांची कामे करणे याबाबतची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये लोहमार्गांची संख्या वाढविणे, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, सिग्नलिंगचे काम आणि तसेच इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे.
गाड्यांचा वेग वाढल्याने काय होणार…
– प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार
– प्रवाशांसाठी अधिक जलद प्रवासाची सोय
– प्रवास वेगवान झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढणार
– गाड्यांचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत
– गाड्यांची संख्या वाढविता येणे शक्य