पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली विभागात यंदा कोल्हापूर विभागाने सर्वात जास्त उत्पन्न मिळविले आहे. पुणे विभाग दुसऱ्या स्थानी आहे. दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली. पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षपिक्षा २ कोटी ८५ लाख २२ हजार रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीत एसटी बसला प्रवाशांनी पसंती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी आर्थिक संकट असतानादेखील महामंडळाने भाडेवाढ न करता सुसज्ज नियोजन आणि सुसूत्रता राखत एसटीच्या तिजोरीत भर घातली आहे.
एसटी महामंडळाकडून नोव्हेंबर महिन्यात १० टक्के हंगामी भाडेवाढ न करता जादा बसेस सोडल्या जात होत्या. मुळात एसटी महामंडळाकडे वाहन ताफा कमी आहे. परंतु, प्रवासी संख्या वाढली आहे. यंदा कोल्हापूर विभागाचे तब्बल ३ कोटी ४४ लाख ६८ हजारांनी उत्पन्न वाढले, तर पुणे २ कोटी ८५ लाख २२ हजार, सातारा २ कोटी ४६ लाख २२ हजार, सोलापूर १ कोटी ५८ लाख ५४ हजार, तर सांगली विभागाला सर्वात कमी म्हणजे १ कोटी ३६ लाख ९८ हजारांची वाढ उत्पन्नात झाली आहे.
दरम्यान, एसटी बसचे विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, सर्व आगार व्यवस्थापक, शाखा प्रमुख, पालक अधिकारी, सहायक वाहतूक अधीक्षक, सहायक कार्यशाळा अधीक्षक, अधीक्षक, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कुसेकर यांनी केले आहे.