चाकण, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथे मोबाईल फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या भांडणातून २३ वर्षीय युवकाचा गळा आवळून आणि डोक्यात लोखंडी तवा मारुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना महाळुंगे इंगळे येथे २९ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
कालू मंगल रकेवार (वय २३ वर्ष, सध्या रा. महाळुंगे, मुळ रा. पथरीया, ता. जि. दमुही, मध्यप्रदेश) असं खून करण्यात आलेल्या युवकाचा नाव आहे. याप्रकरणी पप्पू मंगल रकवार (वय. ४० वर्ष, सध्या रा. महाळुंगे, ता. खेड, जि.पुणे, मूळ रा. पथरीया, ता. जि.दमूही, मध्यप्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रामसिंग (वय ३० वर्ष, रा. रेवाना ता. जि. दमुही मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत पप्पू, कालू आणि राम सिंग हे तिघे परप्रांतीय ठेकेदारीवर काम करतात. तसेच एकाच भाड्याच्या खोलीत महाळुंगे इंगळे येथे राहतात. मागील दोन दिवसांपूर्वी कालू याने राम सिंग याचा मोबाईल फोडला होता. यावरून दोघांमध्ये २८ मार्चला जोरदार भांडणे सुरू होती.
पप्पू हा रात्री दहाच्या सुमारास घरी गेला तेव्हा रामसिंग हा गुलाबी फेट्याने कालूचा गळा आवळून उजव्या हातातील लोखंडी तव्याने कालूच्या डोक्यात मारत होता. यामध्ये काळूचा मृत्यू झाला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.