पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील (Daund News) राजेगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका (Pune Crime) व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत विजेंद्र प्रल्हाद भोसले यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वरूप भोसले, आदेश भोसले आणि फिर्यादी ऋषिकेश भोसले हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मार्च 2026 रोजी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान राजेगाव येथील राजेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली. नळजोडणी आणि जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला होता. त्यानंतर काही जणांनी कोयते आणि काठ्या घेऊन हल्ला केला.
आरोपींमध्ये निलेश जनार्धन भोसले, दिनेश जनार्धन भोसले, योगेश जनार्धन भोसले, महेश पांडुरंग भोसले, जनार्धन दादु भोसले आणि राज दत्तात्रय भोसले यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्रितपणे हल्ला करत जखमींना मारहाण केली.
हल्ल्यादरम्यान विजेंद्र भोसले यांना पकडून ठेवण्यात आले आणि दिनेश भोसले याने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर आरोपींनी इतरांना देखील धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर सध्या भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे यांनी गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.







