लोणी काळभोर, ता. 29 : पोलीस ठाण्याच्या हद्दीत धारदार शस्त्र घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ताब्यात घेतले. रविवारी (ता. 29) पहाटे सव्वा चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

निखील सुरेश गायकवाड (वय 21, रा. गुजर वस्ती, कवडीपाठ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 29) पहाटे सव्वा चारच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत कोल्हापुरी हॉटेलजवळील बोळात एक तरुण संशयास्पदरीत्या थांबला असून, त्याच्या कमरेला कोयत्यासारखे हत्यार असल्याची माहिती मिळाली. त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि निळसर जीन्स परिधान केली असल्याचेही सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीची वरिष्ठांना कल्पना देऊन दोन पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी माळी मळा परिसरात सापळा रचला. पहाटे साडेचारच्या सुमारास कोल्हापुरी हॉटेलजवळील बोळात छापा टाकून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्या पॅन्टमध्ये कमरेला खोचलेला 17 इंच लांबीचा, लाकडी मुठीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. कोयता पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद केले.
दरम्यान, विनापरवाना धारदार हत्यार बाळगल्याप्रकरणी गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोरे आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.






