पुणे : आधार कार्डचा आर्थिक गैरव्यवहारात गैरवापर झाल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कोथरूड येथील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘डिजिटल अटक’चा धाक दाखवत आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाकडून कुटुंबीयांची माहिती, आर्थिक तपशील आणि बँकेतील रक्कम मिळवली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे पोलीस निरीक्षक कारोटी पुढील तपास करीत आहेत.

२० नोव्हेंबर रोजी दुपारी तक्रारदारांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदारांच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून, त्यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात २० तक्रारी दाखल असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल करण्यात आला. या वेळी आपण कुलाबा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी संदीप राव बोलत असल्याचे भासवण्यात आले. मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात तक्रारदारांचे नाव आल्याचा दावा करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला.

आरोपींनी तक्रारदारांकडून त्यांच्या कुटुंबीयांची माहिती, मुलाच्या नोकरीसंबंधी तपशील, घरातील सोन्याचे दागिने आणि मुदत ठेवींची माहिती तसेच काही फोटो मागवून घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी ईडी (सक्तवसुली संचालनालय), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय आणि भारत सरकारच्या लेटरहेडवरील बनावट पत्रेही पाठवण्यात आली.
या प्रकरणाबाबत कोणालाही सांगितल्यास मुलाच्या नोकरीवर आणि त्यांच्या जीवितावर परिणाम होईल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे तक्रारदार आरोपींच्या दबावाखाली राहिले.
बँक खात्याच्या पडताळणीच्या नावाखाली आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मुदत ठेवी मोडण्यास सांगितले. त्यातील रक्कम आणि बँक खात्यातील पैसे ठरावीक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण ४५ लाख २० हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपींनी दिलेल्या धमक्यांमुळे तक्रारदारांनी बराच काळ ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र, ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत असल्याबाबतची माहिती वाचल्यानंतर आपलीही आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोथरूड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






